Monday, April 20, 2015

My Choice

आजच्या प्रवासामध्ये साधारण दोन साठीच्या माणसांचं बोलणं मी ऐकलं..
एक : मुलासाठी मुलगी बघतोय..पण आजकालच्या मुलींना वेगळं राहायचं असतं.
मग काय करणार.. नकार कळवतो बरेचसे.. मुलींना तर पोळ्या बनवता येत नाहीत साध्या..
दोन : पोळ्या बनवता येत नाहीत ही मुलींची नाही आईबापाची चूक आहे.. मिळेल रे एखादी संस्कारी मुलगी....

हा डायलॉग ऐकून त्यांना तडक विचारावं वाटलेलं की तुम्हाला मुलगी आहे का? तिला पोळ्या बनवता येतात का गोल? येत असतील तर तुम्ही चांगले आईवडील आहात..तुमच्या मुलीवर चांगले संस्कार केले आहेत तुम्ही!

मुलाच्या किंवा मुलीच्या दोघांच्याही पालकांना लक्षात का येत नाही की स्वतःच्या घरातील मुलीला तितकंच लाडाकोडाने वाढवलं जातं जेवढं आधी मुलाला किंवा घराण्याच्या वंशाला वाढवलं जायचं. मुलीलाही तेवढचं शिक्षण बाय डिफॉल्ट मिळतं जेवढं मुलाला मिळतं..तीही शिक्षण-सबमिशन-नोकरीच्या निमित्ताने तेवढाच वेळ घराबाहेर असते जेवढा मुलगा असतो...मग तिला पोळ्या-स्वयंपाक-धुणं-भांडी-केर-कचरा हे सगळं यायला पाहिजे अशा अपेक्षा कशाला? कारण ती मुलगी म्हणून जन्माला आली आहे आणि तिच्या आधीच्या पिढ्यांनी ते केलं आहे म्हणून तिने ते करायलाच हवं अशा अपेक्षा कशासाठी? मग घरातल्या लग्नाळू मुलाला लग्नाआधी जबाबदारी घेणं-निभावणं, घरातली बाकीची कामं करणं शिकवलं गेलेलं असतं का? लग्न झालेल्या आणि न झालेल्या दोन्ही कॅटेगरीतील मुलांनी व पालकांनी हा प्रश्‍न एकदा स्वतःला विचारून बघा..

दीपिका पदुकोन आणि ‘व्हॉग’ने तयार केलेल्या व्हिडिओ सारखं ‘माय चॉइस’ मुलींना म्हणायची वेळ यायला अजून भरपूर वेळ आहे...कारण दीपिका आणि त्या व्हिडिओमधील बायकांना ते म्हणण्यासाठी आधी स्वतःभोवती वलय तयार करावं लागलं आहे..मग त्या आता कुठे माय चॉइस म्हणू शकतात.. स्वत:च्या चॉइस स्वीकारू शकत आहेत..सर्वसामन्य मुलींना आजून पोळ्या बनवता येतात की नाही बनवायच्या या चॉइससाठीच झगडावं लागतय!  विचार करून बघा एकदा स्वतःशीच...दुसर्‍याचा विचार करणं त्याही पलीकडचं आहे अजून...